Friday, April 24, 2020

चार्वाकाचा विवेक विचार

चार्वाकाचा विवेक विचार

मला आवडलेली Whats app post आहे.

चिंतन :*

*लेखक –डॉ.आ.ह.साळुंखे*

*५.विवेक वापरण्याचा अधिकार ही मोठी देणगी*

प्राचीन भारतात निर्माण झालेल्या दर्शनांमधे *चार्वाक दर्शनाचं* स्थान
अनेक कारणांनी आगळं-वेगळं होतं. जीवनाचा प्रवास करताना आपल्यासमोर जे
काही येतं,त्याची चिकित्सा करावी, जे आपल्या बुद्धीला, विवेकाला पटेल, ते
घ्यावं आणि बाकीचं बाजूला सरावं, या वास्तव भूमिकेवर हे दर्शन उभं होतं.
आपली ही भूमिका लोकांना पटवून देण्यासाठी हे दर्शन मानणाऱ्या एका
तत्ववेत्त्यानं केलेला एक प्रयोग मोठा लक्षणीय होता. किंबहुना, नुसता
लक्षणीयच नव्हे, तर अनुकरणीय,अनुसारणीय होता.
जुन्या परंपरेत वाढलेले लोक त्याची *चिकित्सेची भूमिका* मानायला तयार
नव्हते. स्वतः त्याची पत्नी त्याच्याशी सहमत नव्हती. अखेरीस एके दिवशी
मध्यरात्री तो आपल्या पत्नीला घेऊन गावाच्या वेशी जवळ गेला. तिथून
धुळीच्या रस्त्यावर हाताचे पंजे विशिष्ट पद्धतीनं उठवत उठवत तो गावातील
चौकापर्यंत आला. सकाळी उजाडताना पुन्हा पत्नीला घेऊन चौकात आला. त्या
रस्त्यानं जाणारे लोक धुळीतील खुणा पाहून एकमेकांत चर्चा करू लागले.
लांडग्यांच्या पावलाचे ठसे आहेत, असं म्हणू लागले. रात्रीच्या वेळी
लांडगा येतोय, अशी अफवा पंचक्रोशीतील घराघरातून पसरली. हे सगळं चार्वाक
आणि त्याची पत्नी यांच्या समोर घडलं. अखेरीस त्यांनं तिला तिला विचारलं,
“या धुळीत हे काय आहे?” ती म्हणाली, ‘हे तुमच्या हाताचे ठसे आहेत!’ तो
म्हणाला, असं कसं म्हणतेस? या पंचक्रोशीतील कुणालाही विचार. हे
लांडग्याच्या पावलाचे ठसे आहेत, असंच तुला ऐकायला मिळेल.” यावर ती
म्हणाली, “पंचक्रोशीतील काय, सर्व जगातील लोकांनी येऊन मला तसं सांगितलं,
तरी मी ते खरं मानणार नाही. कारण, हे ठसे तुम्ही आपल्या हातांनी
उठवल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.” *चार्वाक म्हणाला, याचा अर्थ लोक जे काही म्हणतात, ते तू स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर तपासून पाहिलंस आणि जे त्या कसोटीवर टिकलं नाही, ते तू स्वीकारलं नाहीस!* इतकी वर्ष मी
तरी तुला दुसरं काय करायला सांगतोय?”
चार्वाकाचा हा प्रयोग म्हणजे तुम्हा-आम्हा भारतीयांना मिळालेला
*विवेक-प्रामाण्याचा* एक महान वारसा आहे, असं मला वाटतं. या
प्रयोगासारखाच विचार कालिदासानंही एकदा मांडला आहे. मालविकाग्निमित्र या
नाटकात तो म्हणतो,”काव्य जुनं आहे, एवढ्यावरून ते सगळं उत्तम ठरत नाही
आणि नवं आहे एवढ्यावरून निंद्यही ठरत नाही.विवेकी लोक परीक्षा करून
दोहोंपैकी एकाचा स्वीकार करतात. मूर्ख मनुष्य दुसऱ्याच्या अनुभवला
अनुसरून आपली बुद्धी चालवतो.”
*आपली बुद्धी वापरण्याचं स्वातंत्र्य, आपला विवेक वापरण्याचा अधिकार ही निसर्गानं माणसाला दिलेली मोठी देणगी आहे.* आपली बुद्धी वापरायची, याचा
अर्थ दुसऱ्याकडून काही शिकायचंच नाही किंवा इतरांना हिणवून स्वतःच्या
बुद्धीचा गैरवाजवी अहंकार बाळगायचा, असा मात्र नाही. उलट, आपली बुद्धी
नम्रपणानंच वापरायची. ती अहंकारानं डगाळून टाकायची नाही. ज्ञानामुळं
येणाऱ्या अहंकाराचं वर्णन करताना *संत तुकारामांनी म्हटलं आहे, ‘कोढियाचे गोरेपण। तैसे अहंकारी ज्ञान।’* बुद्धीचा अहंकार तर बाळगायचा नाही, पण
आपली बुद्धी दुसऱ्याकडं गहाणही टाकायची नाही, असा *सुवर्णमध्य साधणं* हे
या याबाबतीत आपलं ध्येय असलं पाहिजे.
आपली बुद्धी स्वतंत्रपणानं वापरणं, हे अनेक माणसांना अवघड वाटतं, जड
जातं, हे मात्र खरं आहे. तसं करणं त्यांना असुरक्षित पणाचं वाटतं.
त्यामुळं स्वतःच्या डोक्यावर जबाबदारीचंओझं येतं. अपयशाची, पराभवाची भीती
वाटते. त्यामुळं चाकोरीचा सुरक्षित मार्ग स्वीकारून सुखासमाधानानं जागावं
असं त्यांना वाटतं. पण अशा प्रकारचं सुखसमाधान हा आपल्या मानव्याचा अपमान
आहे, असं मानून *जे लोक स्वातंत्र्याबरोबर येणारं जबाबदारीचं ओझं पेलायला सज्ज होतात, तेच इतिहास घडवतात.समाजाला नवं वळण लावतात.मानवी संस्कृतीवर आपला ठसा उमटवतात.* समाज अशा लोकांकडं आधी संशयानं पाहतो, त्यांना विरोध
करतो,पण नंतर तो त्यांनाच अभिमानानं डोक्यावर घेऊन नाचतो कृतज्ञतेनं
त्यांच्यापुढं नम्रही होतो.

📰📓📔📒📕📗📘📙📚📖✒️

No comments:

Post a Comment